नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरातील महाप्रलयंकारी चक्रीवादळ ‘फोनी’ गेल्या सहा तासात ताशी 10 किलोमीटर वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला सरकत असून आज सकाळी साडेपाच वाजता ओदिशातल्या पुरीपासून 680 किलोमीटरवर तर आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणमपासून 430 किलोमीटर अंतरावर केंद्रीत होत. येत्या 12 तासात हे वादळ आणखी उत्तर-पश्चिम दिशेला सरकून येत्या 3 मे रोजी गोपाळपूर आणि चंदबलीदरम्यान ओडीशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी 175 ते 185 किलोमीटरदरम्यान जाण्याची शक्यता आहे.
इशारा:
फोनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- उत्तर आंध्रप्रदेश- उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर (श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयानगरम जिल्हे) उद्या (2 मे) तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. याच भागात 3 मे रोजीही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
- ओडीशा- दक्षिण ओदिशा किनारपट्टीवर उद्या (2 मे) तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. तटीय ओडीशा आणि ओदिशाच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी अति मुसळधार (>20 सेंमी) पाऊस पडण्याचा इशारा.
- पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालच्या किनारी तसेच अंतर्गत भागात 3 मे रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता.
- अरुणाचल प्रदेश आणि आसाम-मेघालय- अरुणाचलप्रदेश आणि आसाम-मेघालयात 4 आणि 5 मे रोजी बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता, काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा.
वाऱ्याचा वेग:
- येत्या 24 तासात उत्तर तामिळनाडू, पुद्देचरी आणि तटीय दक्षिण आंध्रप्रदेशात प्रति तास 180 ते 190 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. वाऱ्याचा वेग 210 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता.
- उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशा किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग प्रति तास 40 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता. 3 तारखेला ओडीशा किनारपट्टी आणि उत्तर आंध्र प्रदेशात वाऱ्याचा वेग ताशी 115 किलोमीटर वाढण्याची शक्यता.
समुद्राची स्थिती:
- 2 ते 4 मे दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी तसेच ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहील.
- मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला असून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्यांना किनारपट्टीवर परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Share your comments