मुंबई: विदर्भातील हायटेक प्रकल्प पॉलिहाऊस व शेडनेट पद्धतीने शेती केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत चौकशी करून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सांगितले. मंत्रालयात पॉलिहाऊस व शेडनेट या पद्धतीने शेती केलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषीमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. बोंडे म्हणाले, विदर्भातील अशा पद्धतीने शेती केलेल्या सुमारे पाचशे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून इतर संबंधित विभागांशी चर्चा करून यावर तात्काळ मार्ग काढला जाणार आहे. यासाठी शासनाचे संबंधित विभाग, कर्ज वितरित केलेल्या बॅंका व विमा कंपन्यांमार्फत एकत्रितपणे शेतकऱ्यांना सहकार्य केले जाणार आहे.
सन 2009 ते 2015 या वर्षात शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस व शेडनेट या पद्धतीने शेती केली. पण वाऱ्याचा वेग व तापमान अशा विविध गोष्टींचे मोजमाप व अंदाज चुकल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर खासगी तसेच सरकारी बॅंकांचे मोठे कर्ज झाले असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
Share your comments