मुंबई: राज्यातील दूध भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खाजगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याची योजना पूर्वलक्षी प्रभावाने पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच 30 एप्रिल 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या कालावधीसाठी प्रति लिटर 3 रुपये याप्रमाणे अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील दूध भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खाजगी दूध भुकटी प्रकल्पांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयान्वये राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2/8.3 (गाय दूध) आणि त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दुधासाठी अनुदान देण्यात येत आहे. ही योजना प्रथमत: 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत आणि त्यानंतर 31 जानेवारी 2019 या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात दुधाचा पुष्टकाळ साधारणत: दरवर्षी एप्रिल महिन्यापर्यंत असतो. त्यामुळे सध्याच्या कालावधीतही अतिरिक्त दुधाची परिस्थिती असल्याने आजच्या निर्णयानुसार ही मुदत आता 30 एप्रिल 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर दूध भुकटीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दूध भुकटी उत्पादनात वाढ होऊन काही अंशी दुधाचा वापर दूध भुकटी रुपांतरणासाठी होणार आहे. तरीही उर्वरित अतिरिक्त दुधाचा वापर होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन दूध अनुदान दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दुधाला प्रति लिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Share your comments