मुंबई: कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कांदा अनुदानासाठी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. 15 डिसेंबर नंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्यांमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रु. 200 प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 15 डिसेंबर 2018 नंतरही कांद्याच्या दराची घसरण कायम राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी: सन 2018-2019 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये 200/- अनुदान देणेबाबत. (कालावधीत वाढ)
या योजनेचा कालावधी वाढविला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्ती या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
Share your comments