शेतकऱ्यांनी मागील वर्षी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक यांच्याकडून घेतलेल्या पीककर्ज परतफेडीसाठी शासनाने शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यात दिलेल्या मुदतवाढीच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलै पर्यंत दर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली तर शेतकऱ्यांना व्याजात सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकांमार्फत पीक कर्जाचा पुरवठा केला जातो.
रिझर्व बँकेच्या नियमानुसार या घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड ही 365 दिवसांच्या मुदतीत करायची असते. जय शेतकरी या मुदतीत कर्जाची परतफेड करतात म्हणजे 30 जून पर्यंत ही मुदत असते. अशा शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देऊन त्यांचे व्याज माफ केले जाते. परंतु राज्यामध्ये सध्या उद्भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यामध्ये लॉक डाऊन लावण्यात आला होता.
त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना आलेल्या त्यांच्या मालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. शासनाने आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या वाढीव मुदतीत जे शेतकरी कर्जाची परतफेड करतील त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जाईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचेही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
Share your comments