
Import Export News
मुंबई : राज्यभरातील महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे. माहिला बचत गटाच्यां शेतमालाची होत असल्याली निर्यात ही निश्चित प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, एपिडा आणि एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील शिवस्वराज शेतकरी महिला उत्पादक कंपनीचा शेवगा दुबईला निर्यात करण्यात आला, शेवगा घेऊन जाणाऱ्या कंटेनरला उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, एपिडा चे उप महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक मंजिरी टकले, संदीप जठार, एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे चेअरमन प्रवीण वानखडे, अभियान व्यवस्थापक ज्योती पवार, शिवस्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्ष व सर्व संचालक मंडळातील महिला उपस्थित होत्या.
अभियानाच्या दृष्टीने आजचा दिवस मैलाचा दगड ठरणारा आहे, उमेद अभियानाच्या अंतर्गत कार्यरत महिलांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि एपिडा यांच्या मदतीने आज पहिला कंटेनर दुबईला जात आहे. शेतमाल निर्यात करण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर कोल्ड स्टोरेजची व्यवस्था मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे विविध विभागासोबत समन्वय साधण्यात येत असल्याचे श्री. सागर यांनी सांगितले.
यावेळी अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, एपिडाचे उप महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे चेअरमन प्रवीण वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवस्वराज्य शेतकरी महिला उत्पादक गटाच्या अध्यक्ष श्रीमती कौशल्य शंकर जाधव म्हणाल्या की, शेवग्याचे उत्पादन स्थानिक बाजारपेठे पेक्षा जास्त दराने निर्यात होत असल्यामुळे सर्व महिलांना आनंद होत आहे. आम्ही आता आमच्या भागातील महिलांना निर्यात होऊ शकणाऱ्या शेती उत्पादनाचा आग्रह करणार आहे.
Share your comments