पुणे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आपला ऊस जाणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. आता कारखाने सुरु होऊन अनेक महिने झाले तरी त्यांच्या उसाला तोड येत नाही. यामुळे आता त्यांचे नुकसान होऊ लागले आहे. अनेकांच्या उसाला हुमणी लागली आहे, तसेच उसाला तुरे देखील येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने देखील होत आहेत. असे असताना आता या उसाचे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. (Sugar Factory) साखर कारखान्यांकडून नियोजन हुकले असले तरी (Sugar Commissioner) साखर आयुक्त कार्यालयाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरु आहे. यावर आता शेतकरी पर्याय शोधत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात ऊसाचे गाळप रखडल्याने त्याला तुरे तर फुटले आहेतच पण आता उत्पादनातही घट होऊ लागली आहे. मात्र, गाळपाविना शेतकऱ्यांचा ऊस फडात ठेवला जाणार नाही. शिवाय साखर आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय संचालकांना कारखाने हे बंद करता येणार नाहीत. त्यामुळे गाळप हे पूर्णच होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले असून वाढीव काळामुळे घटत्या वजनाचे काय हा प्रश्न कायम आहे. मात्र आपला ऊस जावा हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
आता यावर तोडगा म्हणजे गाळप बंद करण्यापूर्वी साखर कारखान्याच्या संचालकांना साखर आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्यासंबधात कारखाना व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच ऊसाचे गाळप शिल्लक राहणार नाही याची जबाबदारी त्या कारखान्यांचीच राहणार आहे. यंदा क्षेत्रात वाढ झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व चित्र समोर असणार असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
यावर्षी उसाला पोषक वातावरण आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. ऊस उत्पादक मोठ्या देशात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे सध्या भारतात चांगले वातावरण आहे. सध्या यंदाचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात सर्वाधिक गाळप हे महाराष्ट्रात झाले आहे. असे असली तरी अजून 6 लाख टन ऊसाचे गाळप हे शिल्लक आहे. त्यामुळे गाळप होते की नाही याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होण्याची काळजी लागली आहे.
Share your comments