मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (ठाकरे गट) शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षप्रवेश करत शिवबंधन बांधले आहे. मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत (दि.२३) रोजी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील मातोश्री निवासस्थानी उपस्थित होते.
२००९ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला. २००९ काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांचा पराभव करत वाकचौरे खासदार झाले. मात्र २०१४ साली शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला रामराम केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारी घेतल्यानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
शिवसेना व काँग्रेस असा प्रवास केलेले भाऊसाहेब वाकचौरे २०१४ लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसला सोड चिठ्ठी करत भाजपात प्रवेश केला. २०१४ साली स्वबळावर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली. मात्र त्या ठिकाणीही वाकचौरे यांना अपयशाला सामोर जावं लागलं. त्यामुळे आगामी २०२४ लोकसभेच्या दृष्टीने पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत.
दरम्यान, मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण मातोश्री परिसर दणाणून सोडला. वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची नगर जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश करताच उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला आहे.
Share your comments