मुंबई : कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, याप्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग आणि कृषी विभाग हातात हात घालून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला हमी भावापेक्षा हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन कांदा साठवणुकीचे प्रकल्प उभारले आहेत. ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी उभारणी केंद्र निर्माण केले पाहिजे. शेतकरी बांधव सर्वस्व पणाला लावून कांदा पिकवतो अशा वेळेला जर त्याला भाव मिळाला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट कोसळतं. कधीकधी शेतकऱ्याने पिकविलेल्या सोन्यासारख्या शेतमालाला माती मोल भाव मिळतो.
हे थांबविण्यासाठी बाजारात ज्याला मागणी आहे ते पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या उद्घटनांच्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते. यावेळी शिरूर, जुन्नर, वैजापूर, सिन्नर आणि अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथील साठवणुक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
Share your comments