नाशिक: शेती क्षेत्रात कौशल्य विकासाची आवश्यकता असून कौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येईल आणि त्यासाठी कृषी उत्पादक कंपन्यांची मदत घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, सह्याद्रीचे विलास शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेद्वारे तीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषी उत्पादक कंपनीमुळे एकत्रितपणे मोठ्या बाजारपेठेत जाता येते आणि चांगली गुंतवणूकदेखील करता येते. मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादक कंपन्या उभ्या केल्या आणि त्यांची क्षमता वाढविली तर अनुकूल परिवर्तन होईल, तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराला आवश्यक उत्पादन घेता येईल.
शेतीची केवळ उत्पादकता वाढविली आणि विपणनावर लक्ष दिले नाही तर परिस्थिती बदलता येणार नाही. पूर्वजांनी निसर्गचक्र जाणून आणि मातीशी नाते जोडून वैज्ञानिक दृष्टीकोनातून शेती केली. कालांतराने शेती पद्धतीत नाविन्य न आणल्याने अनेक वाण लुप्त झाले. निसर्गचक्र बदलल्यावर शेती संकटात जाऊ लागली. ही परिस्थितीत बदलण्यासाठी शासन आणि शेतकरी एकत्रित येण्याची गरज आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याची संघटित शक्ती कशी काम करते याचा प्रत्यय आला आहे. शेतकरी एकत्रित येऊन जगाची बाजारपेठ काबीज करू शकतो हे दाखवून दिले आहे. सह्याद्रीप्रमाणे राज्याच्या इतरही भागात असे प्रयोग करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने हमी भावाद्वारे गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी केली आहे. मात्र केवळ यामुळे समृद्धी येणार नसून शेतकऱ्याला बाजाराशी जोडण्याची गरज आहे. प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊन शेतमालाला बाजार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. पवार यांनी शासनाने कौशल्य विकासाची महत्वाकांक्षी योजना राबविल्याचे सांगितले. गटशेतीला प्रोत्साहन देतानाच शेतमालाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवारमुळे शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी श्री.शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे सह्याद्री फार्मर्स कंपनीविषयी माहिती दिली. तर अमोल बिरारी यांनी ‘भविष्यातील महाराष्ट्र’ या विषयावर सादरीकरण केले. यावेळी महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री फार्मर्स कंपनीला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
Share your comments