पुणे : शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाने प्रोत्साहन द्यावे, शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच चिंतामुक्त करणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज केले. पुणे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषीमंत्री श्री. भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कृषी परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, संशोधन संचालक हरिहर कौसडीकर आदींसह चारही कृषी विद्यापिठाचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्रबिंदू शेतकरी असल्याचे सांगून भुसे म्हणाले, शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कृषी विभागासह कृषी विद्यापीठांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. देशपातळीवर शेतीसबंधी सुरू असलेले नवीन संशोधनही उपयुक्त ठरणार आहे, शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या संशोधनावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांच्या संशोधन कार्याला निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्वच तालुक्यात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून प्रत्येक तालुक्यात या केंद्राची स्थापना तातडीने करावी, अशी सूचना करून श्री. भुसे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बिजमाता राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणे संवर्धन, नगर तालुक्यातील शेतकरी विष्णू जरे यांनी लसणाच्या वाणाचे संशोधन केले आहे. पालघर जिल्ह्यात महिला अत्यंत चांगल्या पद्धतीने मोगरा फुलशेती करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहन देत मदत केली पाहिजे. कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतकऱ्यांना बांधावर पोहोचण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी समन्वयाने काम करावे, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अधिकचा भर द्यावा लागणार असल्याचे सांगून श्री. भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योग, भाजीपाला शेती वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनेही संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. सर्व मिळून समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते.
Share your comments