पुणे
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाण्याचा पुनर्वापर, वाहतूक व्यवस्था आदी पायाभूत सुविधा विकसित करा, असा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये आले होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे शहरातील विविध विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. या बैठकीला आमदार अण्णा बनसोडे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, वैशाली घोडेकर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनासारख्या विविध लोकल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्याचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. शहराचा सर्वांगीण विकासासाठी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
शहरातील विकास कामे करताना नगर विकासाच्या नियमावलीप्रमाणे कामे झाली पाहिजे. कामे करताना त्रुटी कमी करुन ती दर्जेदार करण्यावर भर दिला पाहिजे. केंद्र व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
पाण्याचा काटकारीने वापर करा
दरम्यान, यंदा राज्यातील मान्सूनच्या स्थितीचा विचार करता सर्वत्र पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. शहराला पवना, आंध्र धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळातील परिस्थितीचा विचार करुन पाण्याच्या काटकसरीने वापराचे नियोजन करावे, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
Share your comments