राज्यात जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. आणि त्यामुळे अचानक थंडीचा कहर वाढला आहे. या कडाक्याच्या थंडीचा पिकांवर परिणाम होत आहे. या थंडीचा फळबाग आणि रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांवर होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी उपाय योजना करण्याची गरज आहे.
राज्यात थंडीची लाट आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडी मोठ्या प्रमाणात आहे. आणि ही थंडी पुढील पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस पपई आणि केळीच्या बागांची काळजी घेणे गरजेचे आहे. केळींच्या घडांना प्लास्टिक पेपरनं आच्छादन करावे. बागांना रात्रीचं पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहते. तसेच बागांमध्ये शकोटी करावी त्याचा फायदा बागांना होतो. त्याच सोबत होणारे दुष्परिणाम होणार नाहीत.
रब्बी हंगामातील पिकांना थंडी पोषक असते. मात्र, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात. अति थंडीचा फटका पिकांना बसत आहे. तापमान 9 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. याचा परिणाम गहू हरभरा आणि रब्बी ज्वारीच्या पिकांवर होत आहे. गहू आणि ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी निंबोणी अर्काची फवारणी करावी. हरभरा पिकांवर कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे.
Share your comments