मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सोलापुरात दाखल झाल्यानंतर तेथील पिकांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोलापुरातील शेतकऱ्यांना जागेवर नुकसान भरपाई प्रतिनिधक स्वरुपात देत प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकाळी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही होते. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसान भरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे. गावक-यांनी धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरे यांनी ग्वाही दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यात रामपूर येथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर ठाकरे यांनी गावक-यांशी संवाद साधला. यावेळी संकटग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांच्या मदतीचे धनादेश ठाकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संवाद साधताना गावक-यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील नुकसानीची पाहणी केल्यानंतर अक्कलकोट येथील भोसले संस्थानकालीन हत्ती तलावाचीही पाहणी केली. त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर येथेही ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे येणे आहे. हे येणे वेळेत दिले गेले तर सध्याच्या अतिवृष्टी व पुराच्या आपत्तीत केंद्राकडे मदत मागावी लागणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. राज्य आणि केंद्र असा दुजाभाव होऊ नये, असेही त्यांनी सुनावले. अतिवृष्टी आणि पुराची आपत्ती मोठी आहे. या संकटात राज्य सरकार आपली जबाबदारी अजिबात झटकणार नाही. हे सरकार जनतेचे आणि शेतकऱ्यांचे आहे. कोणालाही वा-यावर सोडणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
Share your comments