खरीप हंगामाप्रमाणेचं रब्बी हंगामात देखील गारपीट व अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढू लागल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी कपात झाली आहे. हे कमी होते की काय म्हणून अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशा मेटाकुटीला आला आहे. मात्र, काही तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न भंग झाल्याचे कांदा नगरीत बघायला मिळत आहे.
कांद्याचे आगार म्हणून जगात विख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसासमवेतच गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसान द्राक्ष आणि कांदा पिकाचे झाल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी कांदा आता काढणीसाठी म्हणजेच अंतिम टप्प्यात आहे आणि अशा अवस्थेत आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे वावरात पाणी तुडुंब साचले आहे यामुळे वावरातील कांदा नासण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. खरीप हंगामात संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता, यावेळी आलेला अवकाळी पाऊस हा संपूर्ण राज्यात नसला तरी नाशिक जिल्ह्याला याचा मोठा फटका बसत आहे.
खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते खरीप हंगामातील नुकसान निदान रब्बी हंगाम आपण भरून काढू अशी शेतकर्यांना आशा होती मात्र, रब्बी हंगामात देखील हातातोंडाशी आलेला घास अवकाळी नामक राक्षस शेतकऱ्यांकडून हिरावून घेऊन जाईल की काय? असा मोठा प्रश्न आता उभा झाला आहे. अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान कांदा आणि द्राक्ष पिकाचे झाले आहे मात्र, रब्बी हंगामातील पिके देखील यामुळे शेती ग्रस्त झाले असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसातून शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी पुरेसा कालावधी होता.
मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हा आलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांकडून सर्व काही हिरावून घेऊन गेला आहे. द्राक्षे पंढरीत म्हणजेच नासिक मध्ये काल झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदार पुरता मेटाकुटीला आला आहे. गारपिटीमुळे द्राक्ष बागात द्राक्षाचा चिखल झाल्याचे बघायला मिळाले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे बळीराजाचे स्वप्न मातीमोल झाले असून आता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांची सांगड घालत घालतच शेतकऱ्यांना नाकी नऊ येणार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments