खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन शेतमालाच्या बाजार भावात नेहमीच चढ-उतार कायम राहिलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही शेतमाल उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नेहमीच संभ्रम अवस्था बनलेली असल्याचे चित्र बघायला मिळाले. आता सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणि नेमके याच वेळी सोयाबीनच्या बाजार भावात मोठी घसरण नमूद करण्यात येत आहे तर दुसरीकडे कापसाचे बाजार भाव दहा हजारच्या घरात स्थिरवल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचे भाव अजून वधारतील अशी आशा देखील आहे.
सुरुवातीला सोयाबीनच्या भावात विक्रमी वाढ बघायला मिळाली होती. सोयाबीनचे बाजार भाव राज्यात अनेक ठिकाणी दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले होते. मात्र तदनंतर सोयाबीनच्या बाजार भावात मोठी घसरण नमूद करण्यात आली, सोयाबीनचे दर हे पाच हजार रुपये पर्यंत खाली घसरले. तेव्हा कृषी तज्ञांनी केंद्र सरकारने सोया पेंड आयातीला परवानगी दिल्यामुळेबाजार भाव खाली आल्याचे सांगितले होते. मध्यंतरी मग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापारी धोरण अंगीकारले आणि बाजार भाव कमी असताना सोयाबीनची विक्री करण्याऐवजी त्याची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा सोयाबीनचे दर समाधानकारक वाढले. मात्र नंतर पुन्हा सरकारने सोयाबीनवर साठवणूकची लिमिट घालून दिली तसेच वायदे बाजारात सोयाबीनला लक्षणीय मंदीचा सामना करावा लागला, सरकारच्या धोरणामुळे पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरात घसरण झाली. आणि आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना सुमारे एक महिन्यापासून राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच बाजार भाव मिळत आहे. मात्र असे असले तरी सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. बाजारपेठेतील चित्र बघता तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते आगामी काही दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात आता पुन्हा एकदा झळाळी बघायला मिळू शकते.
तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2021 प्रमाणेच 2022 या वर्षीदेखील सोयाबीनला मागणी वाढेल आणि सोयाबीनचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, परिणामी सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, इंडोनेशिया सरकारने नुकत्याच आपल्या धोरणात आमूलाग्र बदल घडून आणला आहे. हा देश सर्वात जास्त पामतेल उत्पादित करतो तसेच त्याची निर्यात देखील करतो. इंडोनेशियाच्या बदललेल्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तसेच सोयाबीनच्या स्टॉकिस्ट खरेदीदारांनी आपल्याकडील सोयाबीन साठवून ठेवला आहे. या लोकांच्या मते, मार्च एप्रिल मध्ये 2021 प्रमाणे सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकते आणि सोयाबीनचे दर हे जवळपास आठ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकतात.
एकंदरीत इंडोनेशिया सरकारचे बदललेले धोरण, मलेशिया मध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे सोयाबिनच्या उत्पादनात झालेली घट, दक्षिण अमेरिकेतले बदललेले हवामान आणि त्यामुळे सोयाबीनवर होणारा विपरीत परिणाम आणि त्यापेक्षाही महत्वाचे कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती या सर्वांमुळे सोयाबीनच्या किमती पुन्हा एकदा हंगाम अंतिम टप्प्यात असताना दर वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. हा अंदाज कितपत खरा उतरतो हा तर गहन चर्चेचा विषय आहे आणि याची सत्यता ही भविष्यात सोयाबीनला किती बाजार भाव प्राप्त होतो यावर अवलंबून असेल.
Share your comments