औरंगाबाद: जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा केवळ 56 टक्के पाऊस पडला असून 65 मंडळांपैकी 29 मंडळांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. याशिवाय मराठवाड्यातील संभाव्य दुष्काळ सदृष्य परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या सर्व जिल्ह्यात जाऊन बैठका घेऊन दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांना गती देण्यात येईल असे प्रतिपादनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विविध बैठकांनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, 1350 गावांपैकी 1330 गावे नजर आणेवारीमध्ये कमी असल्याचे आढळून आले आहे. आगामी काळात पाऊस जर पडला नाही तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. या दृष्टीनेही प्रशासनाने योग्य ते नियोजन केलेले आहे. खरीपाच्या 7.74 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 6.60 लाख हेक्टर पाण्याच्या अभावामुळे बाधित झाले आहे. हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 85 टक्के एवढे आहे. केंद्र सरकारच्या दुष्काळ निकषानुसार अत्यंत शास्त्रीय पद्धतीने याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया करुन 31 ऑक्टोबरपर्यंत टंचाईची स्थिती घोषित करुन सर्व उपाययोजना सुरू करण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मागील वर्षी 193 गावापैकी 176 गावांची कामे पूर्ण झालेली आहेत. 2018-19 मध्ये 304 गावांचा समावेश असून त्यातील 50 टक्के गावांचे काम पूर्ण झालेले आहेत. गाळमुक्त धरण योजनेत मागच्या वर्षी 140 धरणातील गाळ काढण्यात आला आहे. यावर्षी 500 धरणाचे नियोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मागेल त्याला शेततळ्यामध्ये जिल्ह्याने अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. 10 हजार 208 शेततळी पूर्ण झाली असून अजून 10 हजार शेततळ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळ्याचे काम झालेले आहे त्या भागात दुष्काळी परिस्थितीत नक्कीच संरक्षित सिंचन मिळाल्यामुळे फळबागांना जीवनदान मिळाले आहे असेही ते म्हणाले.
Share your comments