आज केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात दाखल झाले आहे. राज्यात खरीप हंगामात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती ओढावली होती. त्यामुळे शेरकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा आजपासून दोन दिवसीय दौरा करत आहे.शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या पथकांकडून पाहणी करण्यात येते आहे.
खरीप हंगामात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्यात एकूण २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे. त्यानुसार दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करत आहे.
या केंद्रीय पथकाकडून आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना , बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पाहणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी, तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, डोणवाडी, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या 11 गावांचा यात समावेश आहे. तर, धाराशिव जिल्ह्यांतील ताकविकी, करजखेडा, लोहारा तालुक्यातील मार्डी, लोहारा बु, माळेगाव, धानुरी, तावशीगड येथे पाहणी केली जात आहे. उद्या म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर , नाशिक , नंदूरबार व जळगावमध्ये हे पथक दुष्काळ पाहणी करणार आहेत. हे पाहणी दौरे संपल्यानंतर पुण्यात एक महत्वाची बैठक होणार असून हा अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
Share your comments