डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे एएमएस १००-३९ हे सोयाबीन वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे. देशातील पाच राज्यात या वाणाला लागवडीची परवानगी मिळाली आहे.
केंद्रीय सोयाबीन वाण ओळख समितीची नुकतीच बैठक झाली असून यामध्ये देशातील विविध प्रांतासाठी सोयाबीनचे एकूण ७ वाण प्रसारित करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अमरावती प्रादेशिक संशोधन केंद्राने विकसित केलेल्या सोयाबीन वाण एएमएस१००-३९ या वाणाचा समावेश आहे.
हा वाण प्रामुख्याने मध्य भारतासाठी म्हणजेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रांतासाठी प्रसारित करण्यात आला. अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन प्रकल्पांतर्गत १२ व १३ मार्चला झालेल्या केंद्रीय सोयाबीन वाण ओळख समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे उपमहानिदेशक डॉ. टी. आर शर्मा (पीक शास्त्र), सोयाबीन अनुसंधान संस्थेच्या निर्देशक नीता खांडेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची सहायक निर्देशक डॉ. संजीव गुप्ता(तेलबिया व डाळवर्गीय पिके ) आदी उपस्थित होते.
वैशिष्ट्ये
हा सोयाबीन वाण जास्त उत्पादन देणारा, कमी ते मध्यम कालावधीचा (९५ ते ९७) असून, या वाणाने अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट चाचणी वाणापेक्षा जास्त उत्पादन नोंदविले. तसेच हा वाण मुळकुज खोडकुज या रोगास तसेच खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींचा मध्यम प्रतिकारक आहे.
Share your comments