सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त कृषी धोरण शास्त्रज्ञ प्रा डॉ शशांक कुलकर्णी यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा स्वर्गीय पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दरवर्षी निरंजन धारा, लखनऊ व शिवशाही फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेंच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय व्यक्तीस दिला जातो. डॉ कुलकर्णी यांची नुकतीच भारत सरकारच्या वतीने निती आयोगाचे कृषी सल्लागार म्हणून निवड झाली असून सद्या ते झारखंड केंद्रीय विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात अध्यापन व संशोधनाचे कार्य करीत आहेत.
डॉ. कुलकर्णी यांनी जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन विभागातून कृषी धोरण या विषयात पीएचडी संपादित केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे वरिष्ठ संशोधक या नात्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांना 'पॉलिसी इकोसाइड' या लोकनीती विषयातील मूलभूत संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते. मूलतः कृषी अभियंता असणारे डॉ. कुलकर्णी यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक भारतरत्न प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या 'स्वामिनाथन कमिशन: अ फाऊंडेशन ऑफ फार्मर्स पॉलिसीज इन इंडिया' या जगप्रसिद्ध संशोधनाभिमुख पुस्तकाला प्रा. स्वामीनाथन यांनी प्रस्तावना लाभली आहे.
पनामा प्रजासत्ताक या देशातील स्वाहिली विद्यापीठाने त्यांना भारताच्या कृषी धोरणातील त्यांच्या योगदानासाठी लोक प्रशासनातील मानद डॉक्टरेट प्रदान करून त्यांच्या सन्मान केला आहे . त्यांनी विविध सामाजिक-राजकीय विषयांवर एकूण अकरा पुस्तके लिहिली असून अत्यंत मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. लोक प्रशासन, सार्वजनिक धोरण, कृषी धोरण, शेतकरी धोरण, ग्रामीण प्रशासन आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. त्यांना मिळालेल्या या महत्त्वपूर्ण पुरस्कारासाठी समाजातील विविध घटकांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
Share your comments