नागपूर : खरीप हंगामातील महत्त्वाचे तेलबियावर्गीय पीक असलेल्या सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात या वर्षी देशांतर्गंत घट नोंदविण्यात आली आहे. बियाणे उपलब्धतेची अडचण हे देशातील सोयाबीन लागवड क्षेत्रात घट होण्यामागील मुख्य कारण असल्याचे निरीक्षण या पार्श्वभूमीवर बाजार विश्लेषकांकडून नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, देश आधीच खाद्यतेलाच्या बाबतीत परावलंबी असल्याने तेलबियावर्गीय पिकांखालील क्षेत्रातील घट सोसवणारी नाही. याउलट अशा पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच घटकांनी पुढाकार घ्यावा, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.
देशांतर्गत गेल्या वर्षीच्या ११८.७६ लाख हेक्टरवरून यावर्षी सोयाबीन लागवड क्षेत्र ११६.३३ लाख हेक्टरवर आले आहे. परंतु ते ११२.८८ लाख हेक्टरच्या सामान्य सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोयाबीन क्षेत्र १११.४६ लाख हेक्टर, २०१८ मध्ये ११०.९५ लाख हेक्टर, २०१७ मध्ये १०२.३४ लाख हेक्टर आणि २०१६ मध्ये ११२.४० लाख हेक्टर नोंदविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार चालू खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र मध्य प्रदेशातील ५८.०९ लाख हेक्टरवरून कमी होत ५२.२० लाख हेक्टरवर आणि राजस्थानमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरीप हंगामात १०.४६ लाख हेक्टरवरून १०.३१ लाख हेक्टरवर घसरले आहे.
महाराष्ट्रात ४१.९७ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र राहते. त्यात मात्र वाढ नोंदविण्यात आली असून, महाराष्ट्राचे क्षेत्र ४४.७४ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात देखील सोयाबीन लागवड क्षेत्र वाढीव असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. कर्नाटक राज्यात गेल्या वर्षी ३.२९ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड होती. या वर्षी ती ३.८३ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात या वर्षी बियाणे उपलब्धतेचा अडसर लागवडीवर परिणाम करण्याची भीती वर्तविली जात होती. कृषी विभागाच्या नियोजनामुळे या संकटावर मात करता आली. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये क्षेत्र सहा लाख हेक्टरने कमी झाले असताना महाराष्ट्रात मात्र लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ नोंदविली गेली आहे.
याशिवाय, सोयाबीनचे क्षेत्र १.४८ लाख हेक्टरवरून गुजरातमध्ये २.२४ लाख हेक्टरपर्यंत वाढले, परंतु त्याच वेळी तेलंगणातील १.६० लाख हेक्टरवरून १.४१ लाख हेक्टर आणि छत्तीसगडमध्ये ७७ हजार हेक्टरवरून ५० हजार हेक्टरपर्यंत कमी झाले. बिहारमध्ये त्याचे क्षेत्रफळ ३० हजार हेक्टर, उत्तर प्रदेशात २९ हजार हेक्टर आणि उत्तराखंडमध्ये २५ हजार हेक्टर इतके नोंदवले गेले आहे. जे की गेल्या वर्षीइतकेच आहे.
हेही वाचा : सोयाबीन पिकावरील रोगांची ओळख व त्यांचे व्यवस्थापन
मध्य प्रदेशची स्थिती चिंताजनक
सोयाबीनच्या उत्पादनात मध्य प्रदेश प्रथम, महाराष्ट्र दुसरा आणि राजस्थान तिसरा या प्रमाणे क्रमवारी आहे. मध्य प्रदेशात प्रतिकूल हवामान आणि बियाण्यांच्या अभावामुळे सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात सहा लाख हेक्टर इतकी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही बाब केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली असून पुढील वर्षी अशी स्थिती ओढवणार नाही याकरिता भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेला दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Share your comments