आपण अनेक ठिकाणी बघत असतो की, विवाह सोहळा हा प्रत्येकच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा मोठा असावा, असे प्रत्येक मुलीच्या वडिलांचे स्वप्न असते. पण आपल्या या स्वप्नांना फाटा देत एका डॉक्टरने आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यावर खर्च न करता एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबाला घर बांधून देण्याचा संकल्प केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. पुण्यातील डॉ. मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री हिचा विवाह शनिवारी ऋषिकेश गोसावी यांच्याशी होत आहे.
या विवाहानिमित्त्त डॉ. मिलिंद भोई यांनी नांदेड जिल्ह्यातील अर्धामपूर गावातील लक्ष्मी साखरे यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी साखरे यांचे कुटूंब अर्धामपूर गावात एका झोपडीत राहत होते. आता स्वतःच्या नवीन घरात राहायला गेल्यानंतर या कुटूंबाच्या चेहऱ्यावरील आनंद अनोखा असेल, अशी भावना डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धामपूर गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी लक्ष्मी साखरे जिद्दीने कष्ट करत आहेत.
लक्ष्मी साखरे दिवसभर शेतात राबतात आणि सायंकाळी त्याच्या मुलांचा अभ्यास घेतात. सध्या डॉ. मिलिंद भोई यांनी केलेल्या या कृतीचे सर्व राज्यभरातून कौतुक होत आहे. या घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे . पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून पुण्यजागर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक साहित्य आणि शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच अनेक समाजउपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतात. यामुळे अनेकांना मदत केली जाते.
तसेच पुण्यातील विविध कुटुंबात दहा दिवस या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना घेऊन दिवाळी साजरी केली जाते. यामुळे दरवर्षी अनेकांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. यामुळे ऋषिकेश गोसावी यांच्या कुटुंबानेही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे आता या कुटूंबाला चांगल्या आणि आपल्या हक्काच्या घरात राहता येणार आहे, याचे समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होते.
Share your comments