वांगी या पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप, रब्बी आणि उन्हाळयातही करता येते. कोरडवाहू जमिनीवर आणि मिश्रपीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. आहारात वांग्याचा भाजी, भरीत, वांग्याची भजी, इत्यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे अ ब क ही जीवनसत्वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते.
जमिन –
वांगी हे पीक सर्वप्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकते. काळी भारी जमीन शक्यतो वांगी पिकाच्या लागवडीसाठी वापरू नये करणा काळ्या जमिनीत कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण जास्त असल्यान कारणाने जमीन तापते व कॅल्शिअम कार्बोनेटमुळे फळांवर चट्टे पडतात. पाणथळ भागामध्ये अतिउष्णता असणार्या भागामध्ये फुलगळ मोठ्या प्रमाणात होते.
लागवडीचा हंगाम:
महाराष्ट्रातील हवामानात वांगी पिकाची लागवड तिन्ही हंगामात करता येवू शकते. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवडयात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामासाठी बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये लावण्यात येतात.
वांगी पिकाची सुधारित जाती -
मांजरी गोटा :महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीचे झाड बुटके आणि पसरट असते. पाने आणि फळांच्या देठावर काटे असतात. फळांचा रंग जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर ४ ते ५ दिवस टिकतात. पिकाचा कालावधी १५० -१७० दिवसांचा असतो.
वैशाली : वांग्याच्या या वाणाचे झाड बुटके आणि पसरट असून, फुले आणि फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून फळांचा रंग आकर्षक जांभळा असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे झुबक्यात येतात. वैशाली या जातीच्या फळांची गुणवत्ता साधारण असली तरी भरघोस उत्पादन आणि लवकर येणारी असल्यामुळे शेतकरी याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.
अनुराधा : अनुराधा ही वांग्याची जात मांजरीगोटा व पुसा पर्पल क्लस्टर यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. गोल, काटेरी, आकर्षक रंगाची लहान फळे असणारा हा वाण पर्णगुच्छ व शेंडे अळीला कमी प्रमाणत बळी पडतो.
महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण –
शेंडा आणि फळे पोखरणारी अळी : या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. फिकट पांढर्या रंगाच्या ह्या अळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. फळे लहान असताना अळी फळात शिरून फळाचे नुकसान करते. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रथम कीड लागलेले शेंडे अळीसकट नष्ट करावेत, २.५ मिली सायपरमेथ्रीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे : ही कीड पानातील रस शोषून घेते, त्यामुळे पाने आकसल्यासारखी दिसतात.
या किडीच्या नियंत्रणासाठी १० मिली डयामेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कोळी : ही सूक्ष्म कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाचा खालचा भाग पांढरट लाल रंगाचा दिसु लागतो आणि पानातील हरितद्रव्ये कमी झाल्यामुळे उत्पादन घटते. त्याचबरोबर फळे पांढरी पडतात.या किडीच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण –
मर : मर रोग हा बुरशीजन्य रोग असून जमिनीत असणार्या फ्युजॅरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने पिवळी पडुन झाडांची वाढ खुंटते आणि शेवटी झाडा मरते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगास बळी न पडणार्या जातींची लागवड करावी. नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करावी .
बोकड्या किंवा पर्णगुच्छ : या रोगामुळे वांग्यच्या झाडांची आणि पानांची वाढ खुंटते. हा रोग अतिसूक्ष्म अशा मायकोप्लाझ्मा या विषाणूंमुळे होतो.रोगाच्या प्रथमावस्थेत रोगट झाडे उपटून नष्ट करावीत.तुडतुडे या किडीचा बंदोबस्त करावा.
सूत्रकृमी : जमिनीतील सूत्रकृमीमुळे झाडाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि झाडाच्या मुळांवर गाठी येतात.या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट या आयुर्वेदिक किटकनाशकाची फवारणी करावी आणि पिकाची फेरपालट करावी.
Share your comments