मुंबई: केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटल मागे 5 हजार 675 रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किंमतीने तूर खरेदीसाठी आतापर्यंत 134 तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रावर आतापर्यंत 17 हजार 264 शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तसेच काही खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
यावर्षी राज्यातील तुरीचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. ज्या भागात तुरीचे उत्पादन जास्त आहे आणि खरेदी केंद्र सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी असेल त्या भागात सुध्दा खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये आणि ही विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी आपला 7/12 उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, जर आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापारी तूर खरेदी करत असतील तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
Share your comments