1. बातम्या

पिकांवरील किडींच्या बाबतीत गाफील राहु नका

KJ Staff
KJ Staff


परभणी: क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन गेल्‍या दोन वर्षात पिकांवरील किड-रोग व्‍यवस्‍थापनाबाबत मोठया प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये सर्वांच्‍या मदतीने सामुदायिकरीत्‍या जागृती करण्‍यात आली, त्‍याचाच परिणाम पिकांवरील किड-रोगांचे चांगल्‍या प्रकारे व्‍यवस्‍थापन करू शकलो. परंतु यावर्षी गाफील राहुन चालणार नाही, दरवर्षी पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होत आहे, तसेच किडींमध्‍ये प्रतिकारशक्‍ती निर्माण होतात, निसर्गात स्‍वत:ला टिकुन ठेवण्‍याचा उपजत गुण किडींमध्‍ये असतो, मागील वर्षी किडींचे व्‍यवस्‍थापन करण्‍यात यशस्‍वी झालो, म्‍हणुन गाफील राहु नका. पिकांवरील किड व रोगाबाबत बारकावे समजुन घ्‍या, असा सल्‍ला कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी दिला. 

राज्‍याचा कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने पिकांवरील किड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला प्रकल्‍प (क्रॉपसॅप) अंतर्गत मास्‍टर ट्रेनर्सचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 20 व 21 जुलै रोजी करण्‍यात आले असुन दिनांक 20 जुलै रोजी प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. डी. जी. मुळे, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्‍पात गेल्‍या वर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळीवरील व्‍यवस्‍थापनावर भर देण्‍यात आला, यावर्षी मक्यावरील लष्‍करी अळीचा उद्रेक वाढतांना दिसुन येत आहे. ही किड अंत्‍यत चिवट असुन अनेक पिकांवर तिचा प्रादुर्भाव होत असल्‍यामुळे त्‍याचे व्‍यवस्‍थापन करणे अवघड बाब आहे. महाबीजच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाचे नांदेड-44 हे वाण बीटी स्‍वरूपात यावर्षी मर्यादित स्‍वरूपात विक्रीसाठी उप‍लब्‍ध झाले, लवकरच विद्यापीठ विकसित अधिक उत्‍पादन देणाऱ्या चांगल्‍या वाणाचे बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी महा‍बीज सोबत सामजंस्‍य करार करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे येणाऱ्या काळात विद्यापीठ विकसित कापुस वाणाचे बियाणांचा बाजारातील वाटा वाढेल.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्‍पात कार्य करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी किडींचे अचुक निरिक्षणे घेतल्‍यास त्‍या किडींचे वेळीच व्‍यवस्‍थापनाबाबतचा सल्‍ला शेतकऱ्यांपर्यंत पोहचवुन प्रभावी नियंत्रण करता येईल. तर जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. डि. जी. मुळे म्‍हणाले की, विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानाच्‍या आधारे गेल्‍या वर्षी सर्वांच्‍या प्रयत्‍नांने कापसावरील गुलाबी बोंडअळीवर प्रभावी नियंत्रण मिळविता आले. प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन याही वर्षी कृषी सल्‍ला प्रभावीपणे प्रत्‍येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचला पाहिजे.

यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते लष्‍करी अळीचे व्‍यवस्‍थापन व गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन यावरील भितीपत्रिकेचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. आनंद बडगुजर यांनी केले तर आभार श्री. सय्यद शेख यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात मराठवाड्यातील आठही जिल्‍हयातील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व कृषी विद्यापीठातील जिल्‍हा समन्‍वयक यांचे मास्‍टर्स ट्रेनर्स व विद्यापीठातील अधिकारी, शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध विषयावर विद्यापिठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन यात सोयाबीनवरील किडींचे व्‍यवस्‍थापनावर डॉ. डी. जी. मोरे, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ. पी. आर. झंवर, रसशोषक कीडींचे व्‍यवस्थापनावर डॉ. ए. जी. बडगुजर, मक्यावरील लष्‍करी अळीचे व्‍यवस्‍थापनावर डॉ. बी. व्‍ही. भेदे, तुरीवरील किडींचे व्‍यवस्‍थापनावर डॉ. एस. डी. बंटेवाड, हवामान बदलानुसार पिक पध्‍दतीवर डॉ. बी. व्‍ही. आसेवार, जैविक किड व्‍यवस्‍थापनावर डॉ. एस. डी. धुरगुडे, पिकांवरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ. पी. एच. घंटे, कापुस उत्‍पादन तंत्रज्ञानावर प्रा. अरविंद पांडागळे, सोयाबीन उत्‍पादन तंत्रज्ञानावर डॉ. एस. पी. म्‍हेत्रे, क्रॉपसॅप प्रकल्‍पातील प्रात्‍यक्षिक व तपासणीवर डॉ. के. जी. अंभुरे आदी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters