आटपाडी : डाळिंब फळपीक तीन वर्षांपासून बदललेले हवामान, वाढलेले तापमान, पाऊस आणि आर्द्रता, तेलकट डाग रोगाबरोबर वेगाने वाढलेला मर, पीन बोरर आणि पाकळी करपा रोग, वाढलेला खर्च, विमा कंपन्यांचा ठेंगा, त्यात भर म्हणून कोरोनामुळे येणारी टाळेबंदी, या समस्यांच्या चक्रात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असून, राज्यभरात बागांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात झाली आहे.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना गेली पंचवीस वर्षे आर्थिकदृष्ट्या तारण्याचे काम डाळिंबाने केले. अत्यंत कमी पाण्यात आणि खर्चात येणारे पीक, अशी ओळख झाली आहे. राज्यात दीड लाख हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. गत तीन वर्षांपासून हवामानात प्रतिकूल बदल झाला. तीनशे मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या आटपाडी, सांगोला, माण, खटाव, माळशिरस, जत, कवठेमहांकाळ, नाशिक, पंढरपूर भागात पावसाचे प्रमाण तिप्पट झाले आहे. त्यामुळे नवीनच समस्या निर्माण झाल्या आहेत.
वाढलेला पाऊस, तापमान आणि आर्द्रतेमुळे तेलकट डाग रोगाने थैमान घातले आहेच. जादा पावसाने खोलवर जमिनी भिजल्याने मर रोगाने बागांच्या बागा वाळून गेल्या आहेत. त्यात यंदा पीनबोरने पूर्ण बागाच वाळून चालल्या आहेत. तेलकट डाग रोग, मर आणि पीन बोररमुळे बागा वाळून गेल्याने काढून टाकल्या जात आहेत. त्यातून राहिलेल्या बागांना सेटिंग न होणे, पाकळी करपा आणि कुज रोगाचा प्रार्दुभाव आहेच.
कमी खर्चात आणि दहा-पंधरा फवारण्यात येणारे डाळिंब ३५ ते ४५ फवारण्या करूनही पदरात पडत नाही. कीडनाशके आणि खतांवरील खर्च तिप्पट झाला आहे. २५ टक्के शेतकऱ्यांच्या पदरात चांगले उत्पादन पडते, तर ७५ टक्के शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही, असे तीन वर्षांपासूनचे चित्र आहे. कोरोनामुळेही भावाचा फटका बसला आहे. या परिस्थितीत विमा कंपनीनेही हात वर केलेत. नवीन लागवडीच्या क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्र बागा काढण्याचे काम चालू झाले आहे.
डाळिंबासमोरील आव्हाने
१) वाढत चाललेला पाऊस, तापमान आणि आर्द्रता.
२) जादा पावसामुळे मर, पीन बोरर आणि पाकळी करपा रोगाचा वेगाने प्रसार.
३) पंधरा फवारणीत येणाऱ्या पिकासाठी ४५ फवारण्या करूनही अनिश्चितता.
४) खर्चात तिप्पट वाढ, उत्पादन बेभरवशी.
५) मर आणि पिन बोररपासून झाडे वाचवण्यासाठीच्या महागड्या प्रयत्नांना अपयश.
Share your comments