1. बातम्या

दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
आमदार दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. श्री वळसे पाटील हे दुसऱ्यांदा या पदावर निवडून आले असून त्यांच्या पदाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.

सहकारी साखर कारखाना महासंघाच्या नव-निर्वाचित पंधरा संचालकाची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली व या बैठकीत श्री. वळसे पाटील यांची एकमताने निवड झाली तर उपाध्यक्षपदासाठी श्री. केतनभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली.

श्री. वळसे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील काम, महाराष्ट्र विधिमंडळातील कामकाजाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव, राज्याचे मंत्री व विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बजाविलेली कामगिरी याचा अनुभव सहकारी साखर कारखाना महासंघाला मिळत आहे. याशिवाय या क्षेत्रातील प्रश्नांची मांडणी त्यानी केंद्रीय पातळीवर प्रभावी पद्धतीने सादर केल्याने साखरेचे दर, साखर निर्यात, इथेनॉलचे वाढीव दर व इथेनॉल निर्मिती क्षमता वाढीसाठी साखर कारखान्यांना मिळणारी आर्थिक मदत याबद्दलच्या प्रश्नांचे निर्णय केंद्र सरकारच्या स्तरावरून करून घेण्यात मदत झाली आहे.

अतिरिक्त साखर उत्पादनाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखानदारीला भेडसावीत आहे तर यंदा हुमणी किडीच्या प्रादुर्भावामुळे तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे काही राज्यात ऊस व साखर उत्पादनाला फटका बसणार आहे. श्री. वळसे पाटील यांच्या समोर अवर्षणाचे आव्हान आहे मात्र ऊस उत्पादक शेतकरी तसेच ऊस कारखानदारी टिकविण्याची व वाढविण्याची दुहेरी जबाबदारी आली असून या संकटाशी मुकाबला करण्याची पूर्ण क्षमता असणारे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावरील सहकारी महासंघाला प्राप्त झाल्यामुळे देशभरातील साखर उद्योग व समस्त शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters