1. बातम्या

डिजिटल सोल्युशन शेतीसाठी वरदान

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
हवामान आधारित शेतीसाठी सॅटेलाईट व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन दुप्पट करतानाच खर्च कमी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. डिजिटल सोल्युशन शेतीसाठी वरदान ठरू शकते. शाश्वत शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.

पवई येथील आयआयटी मुंबईच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त 'शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांना नमस्कार असे म्हणत उपराष्ट्रपतींनी भाषणाची मराठीतून सुरूवात केली. आपल्या मातृभाषेचा आदर करा, असेही त्यांनी सांगितले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मला शेतीच्या प्रश्नांची जाण आहे, असे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, शेतीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी एएफआयटीए आणि डब्ल्यूसीसीए या दोन आंतराराष्ट्रीय संस्थांनी एकत्र येऊन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे ही कौतुकास्पद बाब आहे.

श्री. नायडू यावेळी म्हणाले, शिक्षकाला आपला मुलगा शिक्षक व्हावा असे वाटते. डॉक्टरला आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी इच्छा असते. मात्र शेतकऱ्याला आपला मुलगा शेतकरी व्हावा असे वाटत नाही त्याला शेती क्षेत्रातील अनियमितता कारणीभूत आहे. देशातील शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा त्यावर परिणाम होत असतो, अशा विचित्र परिस्थितीत पीक घेण्यासाठी खर्च वाढतो आणि त्या तुलनेने उत्पादन अल्प येते. म्हणून शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. शेतीचे उत्पादन दुप्पट करतानाच त्यावरील खर्च कमी करता आला पाहिजे. सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा विकास झाला पाहिजेत्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.

तंत्रज्ञानावर आधारित शेती करताना शेतकऱ्यांना हवामान, आधुनिक पीक पद्धती याबाबत अचूक माहिती व मार्गदर्शनाची गरज आहे. मोबाईलचा वापर त्याचबरोबर पीक पाहणीसाठी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक थेंबात जास्त उत्पादन ही दुसरी हरितक्रांती ठरेल अशा विश्वासही श्री. नायडू यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतीला दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालनाची जोड देऊन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर द्यावा. अभिनव कल्पनेतून साकारलेले तंत्रज्ञानग्रामीण भागात पायाभूत सुविधांची उभारणी, शेतीच्या उत्पादनांचे ब्रँडिंग त्याचबरोबर स्मार्ट शहरांबरोबरच स्मार्ट गावे निर्माण झाल्यास स्मार्ट शेतकरी तयार होतीलअसेही श्री. नायडू यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा शेतकऱ्यांना द्यावी

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. तावडे म्हणाले की, इस्राईलसारख्या देशात तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीतील खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात यश मिळविले आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा दिला आहे. त्याप्रमाणे आपल्या देशातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा. देशभरात महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. त्यानुसार ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. शेतीसाठी पाणी (गंगा) उपयुक्त आहे तशी आधुनिक तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आयआयटी चे संचालक प्रा. सुरेश यांनी प्रास्ताविक केले. या परिषदेत सुमारे 20 ते 25 देशांतील संशोधक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाची सुरूवात आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters