
मुंबई -विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सरकारला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भचा विसर पडल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. या तिन्ही विभागातील नागरिकांना अर्थसंकल्पात काहीच मिळालेली नाही. कोकणालाही हवे तितके मिळालेले नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प नव्हेतर एखाद्या सभेतील भाषण सादर केल्याची टीकाही फडणवीसांनी केली. या अर्थसंकल्पात कोणत्याच प्रकारची आकडेवारी नव्हती. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा फक्त भाषणाबाजी होती. शेतकऱ्यांना त्यातून काहीच मिळालेले नसून सरकारने फक्त तोंडाला पाने पुसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे. त्यांना एकही पैसा मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मदतीची घोषणा केली होती. पण सत्ताधारी लोकांना घोषणांचा विसर पडला आहे. त्यामुळे सातबारा कोरा होणार नसल्याचं हे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. पीक कर्जाव्यतिरिक्त कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पुढच्या पाच वर्षात ५ लाख सौरपंप बसवून देण्यात येतील.