मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. मराठा आंदोलक सत्ताधारी नेत्यांवर नाराज असून त्यांच्या विरोधात ठिकाठिकाणी आंदोलन करत आहेत. तसेच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी आणि त्यांच्या कार्यक्रमांना विरोध करण्याची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.
बीडच्या धारूरमध्ये मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर मधील शेकटा येथे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केल आहे. त्याचबरोबर सोलापूरच्या कोंडी गावातील मराठा बांधवांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
तसेच पंढरपुरातही हे आंदोलन अधिक आक्रमक होताना दिसत आहे. येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असून यादिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते. आम्ही मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पायही ठेवू देणार नाही आणि कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देणार नाही. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला विठ्ठल मंदिरात दर्शनाला येऊ देणार नसल्याचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्यभर आंदोलनं केली जात असून आज संध्याकाळी मराठा समाजाकडून शहागड फाटा इथून अंतरवाली सराटीपर्यंत कँडल मार्च काढण्यात येणार आहे. या कँडल मार्च मध्ये 123 गावातील हजारो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणसाठी कँडल मार्च काढण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Share your comments