1. बातम्या

अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरियाची केंद्र शासनाकडे मागणी

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


मुंबई : राज्यातील युरियाची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. काही ठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात होती. आता परिस्थितीतून शेतकऱ्यांची सुटका होणार असून राज्य सरकारने केंद्राकडे अतिरिक्त युरियाची मागणी केली आहे. राज्यात युरिया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना युरिया कमी पडणार नाही, असा दिलासा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला.

राज्यातील खत पुरवठ्याबाबत माहिती देताना कृषीमंत्री भुसे म्हणाले की, राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे.  यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाली झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे एकाचवेळी खतांची मागणी वाढली.  त्याचबरोबर यावर्षी द्रवरुप खतांचा वापरही कमी होत आहे, परिणामी युरियाचा वापर वाढला आहे. राज्यातील खतांची परिस्थिती पाहून नुकतेच केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरिया देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे भुसे यांनी सांगितले.

राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १७ लाख मेट्रीक युरियाची मागणी केली होती, मात्र त्यात २ लाख मेट्रीक टन कपात करून राज्याला १५ लाख मेट्रीक टन युरिया पुरवठा झाला आहे. मात्र हा कपात केलेला २ लाख मेट्रीक टन युरियादेखील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. राज्यात गेल्या १५ दिवसांपासून विक्री केलेल्या युरियाचे ट्रॅकींग केले जात असून एखाद्या शेतकऱ्याला ज्या प्रमाणात युरिया विक्री झाली त्याचे तेवढे क्षेत्र आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.  ज्या दुकानांचे साठेबाजीमुळे परवाने रद्द करण्यात आले आहेत, त्यांना पुन्हा विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters