मुंबई: देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसामुळे पाणी तुंबले आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने मुसळधार पाऊस होऊ, शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळे ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.
रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला असून तिथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
12 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागाने रविवारी रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अॅलर्ट दिला आहे.
हेही वाचा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास शासन बांधील – गुलाबराव पाटील
13 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागाने सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट दिला आहे.
14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागाने मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट दिला आहे.
राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवासंपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. आज संततधार पावसामुळे दिल्लीच्या विविध भागात पाणी तुंबल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने मोती बाग आणि आर के पुरम या भागात पावसाचे पाणी तुंबल्याची छायाचित्र एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रकाशित केली आहेत.
Share your comments