Nanded News : नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक येथिल शासकीय रुग्णालयात नागरिकांचे आणि बालकांचे मृ्त्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटर वर आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मागील चार दिवसांत नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यांची संख्या ५१ वर पोहचली आहे. त्यानंतर नांदेड शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे आगामी काळात तर रुग्णालयातील सेवेत बदल होणार का? हे पाहणं गरजेचे आहे. नांदेड रुग्णालयात अद्यापही मृ्त्यूचं सत्र सुरुच आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयात सुरु असलेल्या मृत्यूबाबत राष्ट्रवादीकडून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. राष्ट्रवादीने ट्विट केलं आहे की, निष्पाप बळींना जबाबदार कोण ? शासकीय रुग्णालय असतात तरी कशासाठी ? हा प्रश्न गेल्या ३ ते ४ दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना हादरवून टाकणारा आहे. शासकीय रुग्णालयात औषधांअभावी निष्पाप लोकांचे बळी जात आहेत.
नांदेडमध्ये एका गरीब कुटुंबाने शासकीय रुग्णालयात तब्बल ५० हजारांचा खर्च केल्यानंतरही प्रसूतीनंतर महिला आणि नवजात अर्भक दगावल्याची दुर्घटना मन हेलावून टाकणारी आहे. सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालय परवडत नाही म्हणून ते शासकीय रुग्णालयात धाव घेतात. परंतु, शासनाच्या दिरंगाई कारभारामुळे सर्वसामान्य लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. तरीही सरकारला मंत्रिपदं फार महत्त्वाची गोष्ट वाटत आहे, रुग्णालयातील सर्वसामान्य निष्पाप बळींबाबत सरकारला जाग कधी येणार ? शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची संख्या कधी थांबणार ? हा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा एवढीच विनंती..! असं ट्विट राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय आरोग्य विमा योजना ही गोरगरीब जनतेची क्रूर थट्टा आहे. आजही अनेक खासगी रूग्णालयांत हि योजना लागू नाही. जेथे हि योजना लागू आहे,त्या रुग्णालयांना त्यांची देणी दिली जात नाहीत. या महागाईच्या जमान्यात गोरगरीबांनी न परवडणारे हफ्ते भरुन आरोग्यविमा खरेदी करावा आणि खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे अशी सरकारची इच्छा आहे का?.
Share your comments