राज्यात यंदा दमदार पाऊस झाला असल्याने जलाशयांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग वाढविण्यास वाव असून लागवडीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून फळबागेसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. या योजनेचे आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. नियोजन रोजगार हमी योजनेचे उपसचिव डी. एस. खताळ यांनी हा प्रस्ताव मान्य झाल्याचे कृषी विभागाला कळविण्यात आले आहे.
मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी उपलब्ध झाला आहे. यंदा राज्यात ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर कल्पवृक्ष तसेच फळबाग लागवडीला मान्यता दिली गेली आहे, असे शासनाचे म्हणणे आहे.
काय आहे फळबाग लागवडीची स्थिती - प्रशासकीय मान्यता मिळालेल्या बागांचे क्षेत्र ५९ हजार ३२९ हेक्टर
३० नोव्हेंबरपर्यंत लागवड झालेल्या बागा २८ हजार १८१ हेक्टर
अपेक्षित लागवड क्षेत्र ३१ हजार १४८
दरम्यान यावर कृषी संचालक फलोत्पादन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहयोमधून फळबागांची लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रचार केला जात आहे. मात्र सहभागाची मुगत नोव्हेंबर अखेरपर्यंत संपुष्टात येत होती. आता एक महिन्याची मुदत वाढ मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुदतीत लागवड करावी. लागवड साहित्य मान्यताप्राप्त खासगी व सरकारी रोपवाटिकांमधून मिळवण्याची दक्षता घ्यावी.
Share your comments