खानदेशातून आखातात केळी निर्यातीला या महिन्यात सुरुवात झाली आहे. सध्या रोज सहा कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. केळी निर्यातीच्या कार्यवाहीसाठी काही बड्या कंपन्या खानदेशात केळीची खरेदी करीत आहेत.
या कंपन्यांनी पश्चिम बंगालमधील सुमारे साडेचार हजार मजूर केळी पॅकिंग, काढणीच्या कार्यवाहीसाठी उपलब्ध केले आहेत.गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे केळी निर्यातीला फटका बसला. कारण कुशल मजूर उपलब्ध होत नव्हते. तसेच वाहतुकीसंबंधीदेखील अडचणी होत्या, निर्यात रखडत सुरू होती. यंदा खानदेशातून सुमारे १२०० कंटेनर आखातात निर्यात होण्याची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात झाली असून, सध्या रोज सहा कंटेनर केळीची निर्यात होत आहे. यात एक कंटेनर रोज शहादा तालुक्यातून एका कंपनीच्या मदतीने आखातात पाठविले जात आहे. तर जळगाव जिल्ह्यातून रोज पाच कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे.
सावदा (ता. रावेर), तांदलवाडी (ता. रावेर) येथील केळी पॅक हाउसची मदत केळी निर्यातदार कंपन्यांना केळी पॅकिंग व इतर कार्यवाहीसाठी होत आहे. निर्यातीच्या केळीला १५०० ते १५७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. रावेरात अधिकची निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे.
दरम्यान, सुमारे १२ केळी खरेदीदार कंपन्या खानदेशात केळी खरेदी करीत आहेत. यामुळे केळी दरांवरील दबाव दूर झाला आहे. सध्या आंध्र प्रदेशातही केळी उपलब्ध नाही. यामुळे दिल्ली, पंजाब, काश्मीर आदी भागातूनही खानदेशातील केळीला उठाव आहे. केळीचे किमान दर खानदेशात ८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत, अशी माहिती मिळाली.
Share your comments