देशातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना शेतीसाठी शेणखतही मिळते. मात्र शेतकऱ्यांसमोर अनेक वेळा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. तर काही वेळा हिरवा चारा नसल्यामुळे दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. पावसाळात शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी भरपूर चारा असतो. पण जसजशी उन्हाळ्याची चाहूल लागते तसतसा शेतकऱ्यांकडील हिरवा चारा कमी होत जातो. त्यामुळे दूध उत्पादनावर याचा परिणाम होत असतो.
हिरवा चारा नसल्यामुळे जनावरांच्या शरीरावरही त्याचा परिणाम होतो. जर जनावरांना बाराही महिने हिरवा चारा चालू ठेवला तर जनावरांचे आरोग्यही चांगले राहते. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी शेतकऱ्यांनी
लसूण घासची लागवड करावी, जेणेकरून हिरवा चाऱ्याचा साठा करता येतो.लसूणघास हे उत्तम चारा पीक असून जनावरांसाठी लसूणघास हा एक पौष्टिक चारा आहे. लसूणघास हे द्विदल प्रकारातील चारापीक आहे. हे पीक लुसलुशीत, हिरवेगार व पौष्टिक असते. इतर चारापिकांपेक्षा लसूणघासात जास्त प्रथिने आसतात.
जमिन -
या चारापिकाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करतात. शक्य तो जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. जमिनीचा सामू 7 ते 8 इतका असावा. पूर्वमशागत म्हणजे जमीन भुसभुशीत व तण विरहित असावी.
हवामान -
या चारापिकाची लागवड रब्बी हंगामात करतात. या पिकाच्या उगवणीसाठी थंड हवामान अनुकूल आहे. लसूण घासाची पेरणी वेळेत केल्यास उगवण चांगली होते.
लागवड-
या पीकाच्या पेरणीसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ चांगला असतो. पेरणीसाठी हेक्टरी 25 ते 30 कि. बियाणे वापरावे. दोन ओळीत 25 ते 30 से.मी. अंतर ठेवावे. लागवडीसाठी सुधारित वाण आरएल 88 याची लागवड करावी. लसूण घासची पेरणी करतांना वाफे रुंद व उंच ठेवावेत. तसेच वाफे जास्त उंचही ठेवू नयेत, कारण वाफ्यांमध्ये जास्त पाणी साचून पीकाला मर हा रोग लागण्याची शक्यता जास्त असते.
खते -
हेक्टरी 40 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगले मिसळून द्यावे, तसेच लसूण घास स्फुरद व पालाश या खतांना चांगला प्रतिसाद देतो पेरणीपूर्वी हेक्टरी 20 कि.ग्रॅ. नत्र, 150 कि.ग्रॅ. स्फुरद आणि 40 कि.ग्रॅ. पालाश या प्रमाणात द्यावे.
Share your comments