आपल्या दररोजच्या आहारामध्ये भाज्यांना खुप महत्व आहे कारण भाज्यापासून आपल्या शारिराला आत्यावश्यक अशी पोषक द्रव्ये मिळतात. तसेच अनेक पोषकतत्व असलेल भेंडी हे पिक खरिप व रब्बी दोन्ही हंगामात घेता येत असल्यामुळे भारतातील बहुतेक राज्यातुन भेंडीची लागवड केली जाते. वर्षभर बाजारामध्ये कायम चांगली मागणी असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येतो.
भेंडीच्या फळात अ ब आणि क जीवनसत्वे तसेच मॅग्नेशिअम फास्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम कर्बोदके व लोह इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. भेंडी पिकामध्ये सर्वाधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. भेंडी मध्ये असणाऱ्या लोहामुळे रक्तातील हिमोलोबीन वाढीस लागतो.
जमिन – मध्यम भारी ते काळे कसदार जमीन आणि पाण्याचा चांगला निचरा होईल अशा जमिनीची निवड फायद्याचे ठरते.
हवामान – हे पीक उष्ण व दमट हवामानातील आहे. २० ते ४० अंश सेंटीग्रेड तापमानात भेंडीची वाढ चांगली होते तसेच झाडाची वाढ योग्य होवून फुलगळ होत नाही. यापेक्षा कमी तापमान असेल तर त्याचा थेट परिणाम हा उगवणीवर होत असतो.
पूर्व मशागत – लागवडी आधी जमिनीची मशागत करताना एक नांगरणी व दोन कुळवाच्या पाळ्या देणे गरजेचे आहे. नांगरणी करून जमीन भुसभुशीत केल्यानंतर हेक्टर मध्ये 50 गाड्या शेणखत मिसळावे .
कालावधी – खरीप हंगामात लागवडीसाठी जून व जुलै महिना, रब्बी हंगामासाठी जानेवारी व फेब्रुवारी हा कालावधी योग्य ठरतो.
सूधारित जाती -
महिको 10 - ही सर्वात जास्त महाराष्ट्रातले लोकप्रिय जात असून या जातीची फळे गडद हिरव्या रंगाचे असतात व हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
परभणी क्रांती – मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या ठिकाणी ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीची भेंडी कोवळी, हिरवी किंवा लांब असते. या जातीची लागवडीनंतर 50 ते 55 दिवसात उत्पादन मिळते.
पुसा सावनी – भेंडीची ही जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी वापरली जाते. या जातीची भेंडी दहा ते पंधरा सेंटीमीटर लांब आणि हिरव्या रंगाची असते. उन्हाळी व खरीप हंगामासाठी लागवडीस योग्य. या जातीतून एका हेक्टर मधून आठ ते दहा टन उत्पादन मिळू शकते.
अर्का अनामिका – ही उंच वाढणारी जात असून फळे लांब व कोवळी असतात. या भेंडीचा रंग हा गर्द हिरवा असून फळांचे देठ लांब असतात.या जातीतून हेक्टरी 9 ते 12 टन उत्पादन मिळते.
लागवड - खरीप हंगामात लागवड करण्यासाठी लागवड जून जुलै महिन्यात तर उन्हाळी हंगामासाठी पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करणे गरजेचे आहे. भेंडीची लागवड सपाट वाफेवर केली जाते. खरीप हंगामासाठी दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सें. मी. ठेवावे. दोन रोपांमधील अंतर 30 ते 45 सें. मी. ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर रब्बी व उन्हाळी हंगामासाठी 40 बाय 15 किंवा 16 बाय वीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी.
पाण्याचे व्यवस्थापन– लागवड केल्यानंतर हलकेसे पाणी द्यावे व त्यानंतर पाच ते सात दिवसांच्या अंतराने नियमित पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यामध्ये जमिनीची प्रकार आणि पिकाची गरज लक्षात घ्यावी.
सेंद्रिय खतांचे व्यवस्थापन – लागवडीच्या वेळेस कंपोस्ट खत 15 ते 20 बैलगाड्या प्रति एकर, गांडूळ खत चारशे ते पाचशे किलो प्रती एकर व निंबोळी पेंड चार गोणी प्रतीएकर द्यावे.
रासायनिक खते – पेरणीच्या वेळेस नत्र स्फुरद व पालाश प्रती 50 किलो प्रती हेक्टर याप्रमाणे जमिनीत मिसळून द्यावीत व पेरणीनंतर एक महिन्याच्या कालावधीने नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो या प्रमाणात द्यावा.
कीड व रोग व्यवस्थापन - भुरी रोग – हा बुरशीजन्य रोग असून याचा प्रादुर्भाव झाल्यास पांढऱ्या रंगाची बुरशी पानांवर वाढते व पाने पिवळी पडतात व ते गळून पडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम गंधक दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे.
केवडा रोग– हा एक विषाणूजन्य रोग असून रोगग्रस्त झाडाच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व फळे पिवळट पांढरी होतात. या किडीच्या नियंत्रणासाठी 275 ml मोनोक्रोटोफास 500 लिटर पाण्यात मिसळून दर हेक्टरी फवारावे.
किडींचा प्रादुर्भाव -
पांढरी माशी – ही कीड पानातील रस शोषून घेते त्यामुळे झाडांची वाढ खुंटते व भेंडी लागत नाही. मिथिल डिमिटॉन दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी.
तुडतुडे – ही कीड भेंडीच्या पानाच्या मागे राहून रस शोषण करते. त्यामुळे पाणी पिवळी पडतात व आतल्या बाजूस वळतात. तसेच झाडाची वाढ खुंटते. या किडीच्या नियंत्रासाठी नुवाक्रॉन 2 मिली प्रति लिटर किंवा मिथिल डिमॅटोन दोन मिली प्रति लिटर यांचे ठराविक अंतराने फवारणी करावी.
Share your comments