भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. मेथीमध्ये प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह इत्यादी खनिजे तसेच अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणाते असतात. महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. मेथी हे कमी दिवसात तयार होणारे पीक असून योग्य व्यवस्थापन करून मेथीचे पीक वर्षभर घेता येवू शकते.
हवामान आणि जमीन -
मेथी हे थंड हवामान वाढणारे पीक आहे. विशेषत: कसुरी मेथीची लागवड हिवाळ्यात केली जाते. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमीनीची निवड करावी.
लागवडीचा हंगाम -
रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात आणि खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात मेथीची लागवड करतात. तसेच थंड हवामानात मेथीचे उत्पादन चांगले मिळतो.
लागवड पद्धती -
मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये 20-25 सेंमी. अंतरावर ओळीतून पेरुन करतात. बी ओळीने पेरल्यास खुरपणी, तण काढणे आणि कापणीला सोपे जाते. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. पेरणीनंतर 3-4 दिवसांत साधी मेथी उगवते तर कसुरी मेथीची उगवण्यास 6-7 दिवसांचा कालावधी लागतात. बी पेरल्यापासून 30-35 दिवसांनी मेथीचे पीक काढणीला तयार होते.
खते आणि पाणी व्यवस्थापन -
हेक्टरी 20 किलो नत्र आणि त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी 20 किलो नत्र दिल्याने पिकांची भरघोस वाढ होते. पेरणीनंतर 3 आठवड्यांनी 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीचे पिक चांगले येते.
मेथीवरील किड नियंत्रण -
मावा कीड - ही कीडन पानांमधील रस शोधून घेते, त्यामुळे मेथी खराब होते.
पाने पोखरणारी अळी - या अळीमुळे मेथीच्या पानांवर पांढर्या रंगाच्या रेषा दिसतात आणि मालाचा दर्जा खालावतो. ह्या किडीच्या नियंत्रणासाठी 15 मि.ली. मॅलॅथिऑन (50% प्रवाही) 10 लिटर पाण्यात मिसळून दर 8-10 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे.
Share your comments