खानदेशात (khandesh) गेले काही महिने केळीचे दर स्थिर आहेत. केळी (Banana)ची निर्यात (Export) ही वेगात सुरू आहे. परिणामी, नव्याने केळी लागवडी (Cultivation)ची तयारी सुरू झाली आहे. जून, जुलैमधील लागवडीच्या म्हणजेच मृग बहर केळीखालील क्षेत्र स्थिर राहील. सुमारे ३७ हजार हेक्टरवर लागवड होईल, असा अंदाज आहे.
खानदेशात मृग बहर केळीची लागवड अधिक असते. तर सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान लागवड केल्या जाणाऱ्या म्हणजेच कांदेबाग केळीची लागवड कमी असते. मृग बहर केळी लागवडीत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका आघाडीवर आहे.रावेरात दरवर्षी १९ ते २० हजार हेक्टरवर मृग बहर केळी लागवड केली जाते. यंदाही एवढीच लागवड असणार आहे. त्यापाठोपाठ यावलमध्ये सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर, मुक्ताईनगरात चार हजार हेक्टर, नंदुरबारमधील शहादा तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर आणि तळोदा, अक्कलकुवा भागात मिळून सुमारे तीन हजार हेक्टरवर मृग बहर केळीची लागवड केली जाईल, असा अंदाज आहे. तसेच जामनेर, जळगाव, पाचोरा भागातही काही शेतकरी मृग बहर केळी लागवड करतात.
हेही वाचा : रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मूग व उडीदाची लागवड आहे फायदेशीर
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपुरात कांदेबाग केळी लागवड अधिक असते. मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू झाली आहे. काही शेतकरी मेमध्येच लागवड करतात. तर अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करतात. जुलैपर्यंत ही लागवड सुरू असते. लागवडीसाठी अनेक शेतकरी केळी रोपांना पसंती देतात. मागील वर्षी रोपांचा कमी पुरवठा खानदेशात झाला होता. कारण लॉकडाउन व इतर कारणांनी रोपेनिर्मितीवर परिणाम झाला होता. रोपांची निर्मिती व पुरवठा अनेक स्थानिक व बाहेरील कंपन्या करतात. त्यात मध्य प्रदेश, गुजरातमधील कंपन्यांसह जळगाव, पुणे, नगर, औरंगाबाद भागांतील कंपन्या पुरवठा करण्यासाठी आगाऊ नोंदणी करीत आहेत.
यंदा मागणीपेक्षा अधिक पुरवठा होईल, अशी स्थिती रोपांबाबत आहे. प्रतिरोप १४, १५ रुपये, असे दर आहेत. त्यात थेट शेतापर्यंत पुरवठा करण्याचा खर्चही गृहीत धरला जातो. जळगाव जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवरील केळी लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग होऊ शकतो. तर नंदुरबारातही हा उपयोग सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरसाठी होण्याची शक्यता आहे.
Share your comments