मुंबई: राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसान भरपाईची निश्चिती आणि विमा दावे एक आठवड्याच्या आत निकाली काढावेत, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी येथे दिले. खरीप हंगामामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेती क्षेत्राला बसला. पिकांच्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मिळावी यासाठी मंत्रालयात कृषिमंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक घेतली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खरीप हंगाम 2019 मध्ये 67.33 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या हंगामासाठी तीन जिल्हे वगळता सर्वत्र भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त झाली होती. जालना, हिंगोली, नागपूर या तीन जिल्ह्यांसाठी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त होती. या दोन्ही कंपन्यांनी विमा दावे तत्काळ निकाली काढून शेतकऱ्यांना लाभ तातडीने मिळावा यासाठी आजच्या बैठकीत कृषीमंत्र्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना निर्देश दिले. आठवड्याभरात दावे निकाली काढतानाच त्याचा अनुपालन अहवालही सादर करावा, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
Share your comments