मुंबई
राज्य सरकारने सुरु केलेल्या १ रुपया पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत दीड कोटी शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंतची होती. मात्र, यात केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तीन ऑगस्टपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज भरता येणार असल्याचीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने अडचणी येत होत्या. विमा भरताना सातत्याने सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना हातची कामे सोडून सीएससी केंद्रावर बसून राहायला लागत होते. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख होती पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी विमा अर्ज भरण्यापासून वंचित राहिले होते.
दरम्यान, सर्व्हरच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनजंय मुंडे यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती.
Share your comments