Wardha News : शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन सातत्याने काम करत असते. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्यांना मिळावी यासाठी पिकविमा योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यात 44 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 36 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
प्रजासत्ताकदिनाचा मुख्य ध्वजारोहन समारंभ येथील जिल्हा क्रीडा मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी ध्वजारोहन केले. त्यावेळी शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे उपस्थित होते.
शेतकरी देशाचा कणा
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, शेतकरी या देशाचा कणा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली. या योजनेंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या 4 हजार 945 शेतकऱ्यांना 24 कोटी 21 लाखाचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच यावर्षी आतापर्यंत 73 हजारावर शेतकऱ्यांना 903 कोटीचे पिककर्ज वाटप झाले आहे.
प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण उपलब्ध झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदाच 2 लाख 47 हजार विमा अर्ज प्राप्त झाले. या अर्जधारक शेतकऱ्यांच्या 2 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षण मिळाले आहे. रेशीम शेती फायद्याची आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती आहे. या शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. त्यामुळेच यावर्षी 511 शेतकऱ्यांनी 554 हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे. विभागातील ही सर्वाधिक नोंदणी आहे.
पीएम विश्वकर्मा योजना सुरु
इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवली जात आहे. या योजनेचे जिल्ह्याला 4 हजार 965 घरांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत आपण 3 हजार 698 घरकुलांना मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाने नुकतेच पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली. पारंपारिक 18 प्रकारच्या कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासह कर्ज सुविधेचा लाभ योजनेतून मिळणार आहे. आतापर्यंत 2 हजार 970 कारागिरांनी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यात महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहे. गटांना आपल्या सक्षमिकरणासाठी बॅकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गेल्यावर्षी 9 हजार 330 गटांना 279 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपात जिल्हा आघाडीवर आहे.
Share your comments