शेतकरी बांधव चांगले दर्जेदार उत्पादन मिळावे यासाठी शेतीत अहोरात्र राबत असतो. राब-राब राबल्यानंतर जर बोगस बियाण्यामुळे त्याचे लाखोंचे नुकसान होत असेल तर निश्चितच बळीराजाची मानसिक स्थिती खालावते. ठाणे जिल्ह्यात देखील एका शेतकऱ्याच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला आहे. बोगस बियाणे वापरल्यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील मौजे दिघाशी येथील अनिल पाटील या शेतकऱ्याने तीन एकर शेतात कलिंगड पिकाची लागवड केली होती.
तीन एकर क्षेत्रासाठी त्यांनी आळे पद्धतीने कलिंगड लागवड केली आणि यासाठी त्यांना तब्बल बाराशे बियाण्याची गरज भासली. एप्रिल महिन्यात कलिंगड ला चांगला भाव मिळेल कारण की रमजानचा पवित्र महिना येईल म्हणून या शेतकऱ्याने डिसेंबर महिन्यात कलिंगड पिकाची लागवड केली. रमजान महिन्यात चांगला भाव मिळेल आणि आपण लागवड केलेल्या कलिंगड पिकातून चांगले भरघोस उत्पादन मिळेल अशी आशा अनिल यांनी बाळगली होती मात्र पेरलेले बियाणे बोगस निघाल्याने अनिल यांची भोळी भाबडी आशा आता संपुष्टात आली आहे.
विशेष म्हणजे पदरी चार पैसे पडतील या आशेने अनिल व त्यांचा परिवार गेल्या तीन महिन्यांपासून शेतातच तळ मांडून बसला होता. कलिंगड पिकाची लागवड करण्यापूर्वी त्यांना पूर्वमशागत करावी लागली होती. त्यांनी आळे पद्धतीने कलिंगड लागवड करण्याचे ठरवले असल्याने त्यांना सुमारे अडीचशे आळे खोदावे लागले, एवढे केल्यानंतर त्यांनीपंधराशे बियांची लागवड केली.
विशेष म्हणजे अनिल यांनी बियाण्यांची निवड करतांना तीन कंपन्यांची निवड केली. त्यात सिजेंता कंपनीचे अगस्ता, ऍडव्हंता कंपनीचे गोल्डन सिड्स जीएस 286 तर जेके ऍग्री जेनेटिक्स लि. कंपनीचे जेके सम्राट गोल्ड या बियाण्यांचा समावेश आहे.
कलिंगड लागवड केल्यानंतर अनिल यांनी अहोरात्र काबाडकष्ट केले. या पिकासाठी योग्य प्रमाणात खतांची मात्रा दिली, पाणी व्यवस्थापन देखील जातीने लक्ष घालून केले. मात्र असे असूनही जेके सम्राट या कंपनीच्या वाणाची अंकुरण क्षमता खूपच कमी होती.
विशेष म्हणजे यासाठी कृषी सेवा केंद्र चालक यांच्या सल्ल्याने त्यांनी वेळोवेळी महागड्या औषधांची फवारणी देखील केली. फळधारणा झाल्यानंतर रोपांवरील फळ वाकडे वळू लागले याबाबत त्यांनी कृषी सेवा केंद्र चालकाला कल्पना दिली असता त्यांनी खतांची मात्रा बदलली. त्यानुसार, पुन्हा एकदा अनिल यांनी फवारणी केली मात्र कुठलाच फरक पडला नाही.
शेवटी त्यांनी संबंधित कंपनीला पाचारण केले कंपनीतील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या शेतात आले आणि त्यांनी पाहणी देखील केली. अधिकारी महोदयांनी पोटॅशची कमतरता असल्याचे स्पष्ट सांगितले आणि पुन्हा खतांची मात्रा बदलण्यास आणि त्यांना भाग पाडले. मात्र फळाचा आकार वाकडा राहिला तो वाकडा शेवटी फळ विकसित झाल्यानंतर उन्हात सापडल्याने रोपांवरतीच तडकू लागले अर्थात फळाला तडे जाऊ लागले.
विशेष म्हणजे उर्वरित दोन्ही कंपन्यांची बियाणे चांगले असल्याने त्या पिकातून त्यांना चांगला नफा मिळाला त्यामुळे अनिल यांना जास्त झळ सोसावी लागणार नाही असे सांगितले जात आहे. मात्र सर्वाधिक लागवड जेके सुपर गोल्ड या वाणाची असल्याने अनिल यांना सुमारे साडेतीन लाखांचा आर्थिक भुर्दंड बसला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Share your comments