मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. लेखात देवेंद्र फडणवीस ‘उप’मुख्यमंत्री झाल्याने असंवेदनशील, अहंकाराचे महामेरू बनले आहेत. एका चांगल्या माणसाच्या झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!, असं अग्रलेखात म्हटले आहे. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गरळ ओकली. २०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.
पुढे ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत.‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल."
दरम्यान, सामना वृत्तपत्रा विरोधात तक्रार करणार आहे. मुंबईचे नेते आणि कार्यकर्त्यांचा, सामना वृत्तपत्राच्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा विचार सुरु आहे. दोन्ही प्रकारच्या लढाईची आमची तयारी सुरु आहे. स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन जे लिहिलं जातंय. ते खपू घेण्यासारखं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
Share your comments