अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. रब्बी हंगामात (Ravi Season) गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, या पिकांची लागवड केली जाते. थंडी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असते. मात्र हीच थंडी आता त्रासदायक ठरत आहे.
वातावरणातील वाढलेला गारठा आणि ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम होत आहे. या खराब वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तसेच मग रोग आणि पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
एकाच वेळी ढगाळ हवामान आणि थंडी कायम राहिली तर हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फुलगळी ही होऊ शकते. ज्या ठिकाणी फक्त थंडीचे वातावरण आहे, त्या ठिकाणी पीक वाढीस चांगला फायदा होणार आहे.
दिवसभर ढगाळ वातावरण आणि सकाळ-संध्याकाळ थंडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
मर रोगाचे व्यवस्थापन
हरभरा पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण, सुकलेले लाकूड आधी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेलापेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे नियोजन करावे.
उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना
ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणे महत्वाचे आहे. हरभरा फुलोऱ्यात असताना निंबोळी अर्क, ॲझाडिरॅक्टिन 5 मि.लि प्रति लिटर, एचएएनपीव्ही 500 एलई हे किंवा 1 मिलि प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस 2 मि.लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे तर अशाच पध्दतीने दुसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट 0.3 ग्रॅम किंवा क्लोरॅण्ट्रानिलिप्रोल 0.25 मिलि, फ्ल्यूबेंडायअमाइड 0.5 मिलि किंवा बिव्हेरिया बॅसियाना 6 ग्रॅम याचे मिश्रण 1 लिटर पाण्यात मिसळून ही 15 दिवसाच्या अंतराने करावी लागणार आहे.
तण व्यावस्थापन
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिक सुरुवातीपासूनच तणविरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते25 दिवसाचे असताना पहिली कोळपणी करावी आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीत हवा खेळती राहते.
जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वाफश्यावर करावी. कोळपणी नंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. मजुराअभावी खुरपणी कारणे शक्य नसल्यास फ्ल्युक्लोरॅलीन किंवा पेंडीमीथिलीन या तणनाशकाचा वापर करावा.
खते व्यवस्थापन
पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद प्रती हेक्टर म्हणजेच 125 किलो डायअमोनिम फॉस्फेट (डी.ए.पी.) अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रती हेक्टरला द्यावे. प्रती हेक्टर 50 किलो पालाश दिले असता रोग प्रतिकारक क्षमता वाढते. हरभऱ्याला जस्त या शुक्ष्म द्रव्याचीही गरज असते म्हणून 50 किलो झिंक फॉस्फेट आवश्यक आहे. त्यानंतर पिक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरियाची फवारणी करावी त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. यामुळे पिक उत्पादनात वाढ होते.
पाणी व्यवस्थापन
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २०-२५ दिवसांनी पहिले, ४५-५० दिवसांनी दुसरे आणि ६०-६५ दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. जास्त पाणी दिले तर पिक उभळण्याचा धोका असतो.
हरभरा फुलोऱ्यात असतानाच तीन वेळी फवारण्या
यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा या पिकाचा पेरा झालेला आहे. उत्पादनाची सर्व मदाक आता याच पिकावर आहे. दोन महिन्यापूर्वी पेरणी झालेला हरभरा आता फुलोऱ्यात आला आहे. असे असताना शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा औषध फावरणी करावी लागलेली आहे.
Share your comments