New Delhi : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांवर जातील, असा अहवाल क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्स संस्थेने ४ ऑगस्ट २०२३ रोजी सादर केला होता. पण संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार बाजारात कांद्याचे दरही हवे त्या प्रमाणात वाढले नाहीत किंवा बाजारात पुरवठाही कमी झाला नाही. दर वाढणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा घरात ठेवला. शेतकऱ्यांनी दर वाढण्याची वाट पाहिली. मात्र दर वाढले नाहीत यामुळे साठवणूक ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान झाले. यामुळे या झालेल्या नुकसानग्रस्त कांद्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आता कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.
क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड अॅनालिटिक्स संस्थेने अहवालात काय म्हटले होते?
ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात कांद्याचा पुरवठा कमी असल्याने कांद्याचे दर ६० ते ७० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. तसंच यंदा फेब्रुवारी-मार्चमध्येच कांद्याची विक्री झाल्यामुळे खुल्या बाजारात रब्बीच्या कांद्याचा साठा सप्टेंबर ऐवजी ऑगस्टच्या अखेरीस लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारात पुरवठ्याची कमतरता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे, असं अहवालात नमूद करण्यात आले होते.
क्रिसिलच्या रिपोर्टमुळे कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क
क्रिसिल ही एक जबाबदार संस्था आहे. क्रिसिलने सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोवर जातील, असा रिपोर्ट सादर केला. यामुळे केंद्र सरकारने पुढील काही दिवसांतच कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावले. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान तर झालेच. तसंच क्रिसीलने सादर केलेल्या अहवालानुसार बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांवर पोहचले नाहीत. तसंच पुरवठाही सुरळीत होता. यामुळे संस्थेने सादर केलेला अहवाल पूर्णता फेल ठरल्याचं दिसून आलं आहे.
रिपोर्टमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
क्रिसिलने सादर केलेल्या रिपोर्टमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घरात कांदा साठवणूक केली. दर वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र बाजारात फक्त ६ ते ७ रुपये कांद्याचे दर वाढले. जो कांदा शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात विकायचा होता. त्या शेतकऱ्यांनी दर वाढणार यामुळे कांदा घरात ठेवला. परिणामी दर न वाढल्याने त्या कांद्याचे सद्यस्थितीत मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. तसंच नुकसान झालेल्या कांद्याची जबाबदारी आता कोण घेणार? असा सवालही शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.
सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर २२ रुपये किलो
क्रिसिलने सादर केलेल्या रिपोर्टनुसार बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांवर पोहचले नाहीत. सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याचे दर ४० रुपयांवर होते. तर लिलावात कांद्याचे दर सरासरी २२ रुपये किलो राहिले.
दरम्यान, क्रिसिल संस्थेने सादर केलेल्या अहवालाबाबत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्याशी मेल-द्वारे देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यावर संस्थेकडून कोणत्याही प्रकारे उत्तर देण्यात आले नाही.
Share your comments