परभणी : कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-19 असा उल्लेख केल्याप्रकरणाची कृषीमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याविषयी राज्य शासनाने कोणतेही आदेश दिलेला नसतानाही तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून त्यांची कारवाई करण्याचे महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला निर्देश देण्यात आले आहेत. अकोला कृषी विद्यापीठा अंतर्गत अमरावती कृषी विद्यालयामधील 247 विद्यार्थ्यांना कोविड-19 असा उल्लेख असलेल्या गुणपत्रिका देण्यात आल्या होत्या. आता याप्रकरणी कृषी मंत्र्यांनी चौकशी आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना दिलेली प्रमाणपत्र परत घेऊन नवीन प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आश्वासन पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील विविध शाखांच्या तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-19 असा शिक्का असणार असल्याची बाब समोर आल्यानंतर या वादाला तोंड फुटले. अनेक विद्यार्थी संघटनांनी याला विरोध दर्शवला. काहींनी तर न्यायालयात जाण्याची तयारी केली. तसेच गुणपत्रिकांवर कोविड-19 असा उल्लेख केला जाऊ नये या मागणीचा आग्रह भाजपकडूनही करण्यात येत होता. भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला होता. मात्र असा कुठलाही निर्णय कोणत्याही कृषी विद्यापीठाने घेतला नसल्याचे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी स्पष्ट केले आहे.
अमरावती येथील ज्या प्राचार्यांनी यावरील प्रतिक्रिया दिली आहे, त्यांना याप्रकरणी जाब विचारला जाणार असल्याचेही परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले. तसेच या वृत्तावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील कुलगुरू ढवण यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करत ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे सांगितले होते. आशिष शेलार यांनी याविषयीची माहिती ट्विट करुन दिली होती. 'कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर "प्रमोटेड कोविड-19" असा शिक्का असल्याचे आता समोर आले आहे. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की सरकारच्या अंगाला सुया टोचतात. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही हेच सांगत होतो एवढे दिवस! "ढ" कारभार सगळा!' अशा प्रकारचे ट्विट आशिष शेला यांनी केले होते.
Share your comments