सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले असून परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. यामध्ये अनेकांचे जीव जात असताना हल्ले सुरूच आहेत. रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला तेव्हा त्यावेळी दोन्ही देशातील लोकांच्या मनात युद्धाचीच भीती दाटून आली, मात्र काही वेळानं दोन्ही देशातील लोकांना समजून आले की, हे युद्धच आहे. यामुळे सध्या तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रशिया आणि युक्रेनमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव गुरुवारी युद्धात बदलला. युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत.
आता सगळे सैनिक युक्रेनवर चारही बाजूनी हल्ला करत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील वादाचे मूळ नाटो आहे. NATO म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरुवात 1949 मध्ये झाली. रशियासाठी नेहमीच समस्या असलेल्या युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांचे सैन्य आणि तळ त्याच्या सीमेजवळ येतील, असे रशियाला वाटते. यामुळे या प्रकरणापासून हा वाद वाढत गेला आहे. तेंव्हापासून हे देश काही ना काही कारणाने चर्चेत आहेत.
तसेच 2014 मध्ये युक्रेनच्या रशिया समर्थक राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी झाली तेव्हा रशियाने युक्रेनवर शेवटचा हल्ला केला होता. तेव्हापासून पूर्व युक्रेनमधील बंडखोरीच्या घटनांमध्ये 14000 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. सध्या युक्रेनमध्ये बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचे सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने बुधवारी युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. असे असताना अनेक निष्पाप लोकांचे यामध्ये बळी जात आहेत. तसेच अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी येथे अडकले आहेत. यामुळे त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
असे असताना युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, लुहान्स्क भागात पाच रशियन विमाने आणि एक रशियन हेलिकॉप्टर पाडण्यात आले. तसेच युक्रेनच्या सीमा संरक्षण एजन्सीने सांगितले की, रशियाच्या सैन्याने शेजारील बेलारूसमधून देशावर हल्ला केला. कीव, खार्किव, ओडेसा आणि युक्रेनच्या इतर शहरांमध्ये मोठा आवाज ऐकू आला. दरम्यान, रशियन सैन्याने दावा केला आहे की त्यांनी युक्रेनियन नॅशनल गार्डचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत अनेक गोष्टी समोर येतील.
Share your comments