देशात सर्वत्र कापसाला चांगलीच झळाळी प्राप्त झाली आहे. राज्यात कापसाला विक्रमी बाजारभाव मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच वातावरण बदलामुळे कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात कधी नव्हे ती विक्रमी घट नोंदविण्यात आली. उत्पादनात घट झाली असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. एकीकडे उत्पादनात घट झाली असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत होता तर दुसरीकडे मिळत असलेल्या विक्रमी बाजार भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला आहे.
कापसाने सध्या दहा हजार रुपयांचा आकडा पार करीत अकरा हजार रुपयांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या ठिकाणी कापसाला तब्बल दहा हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. अवघ्या दोन दिवसात 150 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली असल्याचे नमूद करण्यात आले. या खरीप हंगामासाठी शासनाने लॉंग स्टेपलच्या कापसाला सहा हजार पंचवीस रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव ठरवला होता. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा खुल्या बाजारात दुपटीने कापसाला बाजार भाव मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठा प्रसन्न असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यंदा कापसाला सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट सहन करावी लागली होती.
हलक्या जमिनीत लावला गेलेला कापूस केवळ दोनच वेचणीत उचलबांगडी होत आहे तर भारी जमिनीतल्या कापसाला बोंड आळी सारख्या व बोन्डसड सारख्या संकटांचा सामना करावा लागला होता, तसेच काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला अपेक्षित बोंडे फुटत नसल्याची तक्रार केली होती. या प्रतिकूल परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला वावरा बाहेर फेकत दुसऱ्या रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. दिवाळीनंतर कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असला तरी उत्पादनात घट झाली असल्याने 'आजी गेली नातू आला' अशी परिस्थिती झाली असल्याचे समजत आहे. आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बराच काळ कापसाचे भाव स्थिरावले होते मात्र आता बाजार भावात कमालीची वाढ झाली आहे. सध्या कापसाचे बाजारभाव दहा हजाराचा पल्ला गाठून अकरा हजाराचा दिशेने वाटचाल करत आहेत. खाजगी मध्ये शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव प्राप्त होत असल्याने या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पणन महासंघाचे दरवाजे खेटलेच नाहीत.
आता बाजारपेठेत समाधानकारक भाव असतांना देखील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कापूस साठवून ठेवला आहे. मात्र असे असले तरी सुरुवातीला पैशांअभावी अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने सुरुवातीला गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली. त्यामुळेकापूस उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा कापसाच्या व्यापाऱ्याला या भाववाढीचा फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments