या हंगामात कापसाला सोन्यासारखा भाव मिळत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कापसाला जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादनात घट झाली असली तरी फायदा होत आहे. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशावर कात्री मारण्याचे कार्य अमरावती जिल्ह्यात सर्रासपणे चालू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून कापूस खरेदी करणारे व्यापारी मात्र मालामाल होताना नजरेस पडत आहेत.
जिल्ह्यात कापूस खरेदी करणारे व्यापारी कापसाच्या मोजणीत एका क्विंटल मागे सुमारे अर्धा किलो कपात करत आहेत. व्यापाऱ्यांनी यासाठी एक अनोखा युक्तिवाद दिला आहे व्यापाऱ्यांच्या मते धर्म काट्यावर मोजणी करताना प्रति क्विंटल एक टक्का वजन अधिक भरते. त्यामुळे व्यापारी एका क्विंटल मागे अर्धा किलो कापसाची कट्टी कापत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांची दिवसाढवळ्या लूटमार होत आहे. व्यापाऱ्यांच्या या अनैतिक व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दडपशाहीचे उदाहरण देत कापसाची खरेदी बंद पाडण्याचा डाव आखला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, मात्र असे असले तरी जिल्ह्यात कापसाच्या कट्टी कपात करण्याचे सत्र अद्यापही सर्रासपणे चालूच आहे. मित्रांनो, कापसाची मोजणी ही पन्नी काट्यावर जवळपास अशक्यच आहे, त्यामुळे सध्या जिल्ह्यात कापसाची मोजणीही धर्म काट्यावर होत आहे. मात्र धर्म काट्यावर कापसाचे वजन अधिक भरत असल्याचे कारण पुढे करून कापूस खरेदी करणारे व्यापारी एका क्विंटल मागे अर्धा किलो कापसाची कपात करत आहेत. जिल्ह्यात कापूस खरेदी करणारे व्यापारी या पद्धतीने विना कष्टाचे सर्रासपणे आपला खिसा भरतांना दिसत आहेत.
सध्या जिल्ह्यात हजारो क्विंटल कापसाची खरेदी होत आहे, संपूर्ण अमरावती शहरात कापसाच्या मोजणीसाठी एकच धर्मकाटा उपलब्ध आहे, त्यामुळे एदलजी धर्म काट्यावर हजारो क्विंटल कापसाची तोलाई होत आहे. या काट्यावर जिल्ह्यातून कापूस विक्रीसाठी आलेले सर्व शेतकरी तोलाइ करतात. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, जेव्हा कापूस ओला असतो तेव्हा कट्टी कापल्यास शेतकरी विरोध दर्शवत नाहीत. मात्र आता कापूस पूर्णता कोरडा आहे तरीदेखील कट्टी कापली जात असल्याने शेतकऱ्यांनी याविरोधात आवाज बुलंद केला. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आवाज उठवताच शुक्रवारी दुपारपर्यंत चक्क कापसाची खरेदी बंद केली. बाजार समितीच्या मध्यस्थीनंतर कापसाची खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली, मात्र व्यापाऱ्यांनी कट्टी कापण्याबाबत संमती पत्र यावेळी स्वाक्षरी करून घेतली.
असे असले तरी बाजार समितीने व्यापाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. एकंदरीत कापसाच्या विक्रमी बाजारभावामुळे शेतकरी बांधव उत्पादनात झालेली घट भरून काढत होता, मात्र व्यापाऱ्यांच्या या सुलतानी दडपशाहीमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. विशेष म्हणजे कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाचा तसेच नैतिकतेचा देखील धाक उरलेला नाही हे या गोष्टीवरून स्पष्ट झाले आहे.
Share your comments